पोलीस १४४0, निवासस्थाने ३१९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:41 AM2017-09-16T01:41:02+5:302017-09-16T01:41:15+5:30
जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या एकूण ११ पोलीस ठाण्यांसह जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या १४४0 पोलीस कर्मचार्यांसाठी केवळ ३१९ निवासस्थाने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्वच पोलीस ठाण्यांतील कर्मचार्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असतानाही गेल्या ३0 वर्षांहून अधिक काळापासून एकाही नव्या निवासस्थानाची उभारणी करण्यात आली नाही.
शिखरचंद बागरेचा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या एकूण ११ पोलीस ठाण्यांसह जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेल्या १४४0 पोलीस कर्मचार्यांसाठी केवळ ३१९ निवासस्थाने उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्वच पोलीस ठाण्यांतील कर्मचार्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असतानाही गेल्या ३0 वर्षांहून अधिक काळापासून एकाही नव्या निवासस्थानाची उभारणी करण्यात आली नाही.
वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन पोलीस उपविभागात एकूण ११ पोलीस ठाणे आहेत. जिल्हा मुख्यालयासह या सर्व ठाण्यांत मिळून अधिकारी वगळता विविध प्रवर्गातील १४४0 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि, जिल्हा मुख्यालय वगळता इतर सर्वच पोलीस ठाण्यांत कर्मचारी संख्येच्या तुलनेत निम्मीही निवासस्थाने उपलब्ध नाहीत. पोलीस ठाण्यांच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांमधील वाशिम शहर पोलीस वसाहतीमधील निवासस्थाने वगळता इतर सर्वच ठिकाणची निवासस्थाने पडगळीस आली आहेत. त्यामधील ९१ निवासस्थाने, तर वास्तव्यासाठी योग्य नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून रिकामी पडून भकास झाली आहेत. एवढी भीषण परिस्थिती असतानाही जिल्ह्यात गृहविभागाकडून कर्मचारी संख्येच्या तुलनेत नवी निवासस्थाने बांधणे, तर सोडाच; परंतु पूर्वीची निवासस्थाने दुरुस्त करण्याची तसदीही घेण्यात आली नाही. वास्तव्य असलेल्या निवासस्थानांमधील प्रसाधनगृहे आणि शौचालयांची पार दैना झाली आहे. वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ झाल्यानंतर या ठिकाणी मुख्यालयात कार्यरत कर्मचार्यांसाठी १७२ निवासस्थाने उभारण्यात आली; परंतु पोलीस ठाण्यांच्या परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये गेल्या ३0 वर्षाहून अधिक काळापासून एकही निवासस्थान उभारण्यात आले नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ११७९ निवासस्थाने आवश्यक आहेत. या प्रकाराची दखल गृहविभागाने घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सद्यस्थितीत रिसोड पोलीस वसाहतीमधील ५, मालेगावातील ३, शिरपूर जैन येथील १0, मंगरुळपीर येथील १४, अनसिंग येथील ४, आसेगाव येथील १४, जऊळका येथील ३, कारंजा येथील २५, मानोरा येथील ५, धनज येथील ७ निवासस्थाने मिळून एकूण ९0 निवासस्थाने नादुरुस्त असल्याने रिकामी पडली आहेत, तर केवळ ३१९ निवासस्थाने वापरात असून, यामध्ये मुख्यालयातील १७२ निवासस्थानांचा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.
दुरुस्तीचे प्रस्तावही नाहीत!
पोलीस निवासस्थानांच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही प्रस्ताव गृहविभाग किंवा इतर संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहेत काय किंवा पोलीस वसाहतीमध्ये नवी निवासस्थाने बांधण्याबाबत शासनाकडून काही तरतूद झाली आहे काय, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली असता. गेल्या वर्षभरात तरी, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील वसाहतीमध्ये अस्तित्वात असलेल्या निवासस्थांनांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव या विभागाकडून पाठविण्यात आले नसून, नवी निवासस्थाने उभारण्या संदर्भातही शासनाकडून कोणते निर्देश अथवा तरतूद करण्यात आली नसल्याचे कळले. त्याशिवाय आता पोलीस वसाहतमधील पूवीर्ची निवासस्थाने वगळता मुख्यालय किंवा इतर ठिकाणी नव्याने निवासस्थाने उभारण्याची आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याचेही कळले.
केवळ वाशिम जिल्हाच नव्हे, तर पोलीस वसाहतींमधील निवासस्थानांची समस्या सर्वत्र सारखीच आहे. येत्या काळात परिस्थिती सुधारून पोलिसांच्या सर्वच निवासस्थानांचा सकारात्मक पद्धतीने विचार होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस निवासस्थांचे प्रश्न सोडविले जातील, असे आपल्याला वाटते.
- मोक्षदा पाटील
पोलीस अधिक्षक वाशिम