गृह विलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:05 AM2020-04-01T11:05:15+5:302020-04-01T11:05:32+5:30
या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरातून परत आलेल्या नागरिकांनी पुढील १५ दिवस गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहावे, कुटुंबातील व्यक्ती, गावातील नागरिकांशी संपर्क टाळावा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ३१ मार्च रोजी दिले.
या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे. तसेच या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी
संचारबंदी, लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणेसह इतर महानगरातून नागरिक, विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांनी १५ दिवस कुटुंबातील तसेच गावातील इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता घरातच वेगळे राहणे आवश्यक आहे. परंतू अनेक नागरिक व विद्यार्थी हे घरात न राहता गावात फिरत आहेत. अशा सर्व नागरिकांची माहिती पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत घेतली जात आहे. ही माहिती तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाणार आहे.