विसर्जनदरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - वसंत परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:45 PM2020-08-29T17:45:54+5:302020-08-29T17:46:08+5:30
गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शनिवारी संवाद दरम्यान सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाल्यानंतर आतापर्यंत शांततेत, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून आरोग्यविषयक, सामाजिक उपक्रम पार पडले. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शनिवारी संवाद दरम्यान सांगितले.
गणेश विसर्जनदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?
यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शांतता राहावी तसेच कायदा-सुव्यस्था कायम राखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी आणि होमगार्ड असा एकूण दीड हजार अधिकारी, कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे. शहरांमधील प्रमुख चौकातही बंदोबस्त लावला आहे. नागरिकांनीदेखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
गणेश विसर्जनवेळी गर्दी होणार नाही, याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या जातील?
गणेश विसर्जनवेळी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा दंडाधिकाºयांनी मिरवणुकीवर अगोदरच बंदी घातली आहे. नगर परिषद, नगर पंचायत प्रशासनानेकाही ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली तसेच गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. तेव्हा भाविकांनी शक्यतोवर घरीच गणेश विसर्जन करावे. हे शक्य नसेल तर नगर परिषद, नगर पंचायततर्फे नियुक्त कर्मचाºयांकडे गणेश मूर्ती सुपूर्द कराव्या. गणेश विसर्जन स्थळी कुणीही गर्दी करू नये, अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय शांतता समितीची बैठक घेऊन याबाबत जनजागृती, मार्गदर्शनही केले जात आहे. त्याशिवाय विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी भाविक, नागरिकांनीदेखील ाोठ्या संख्येने सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना केली नाही. आतापर्यंत सर्वजण शासन, प्रशासनाच्या सूचना, नियमांचे पालन करीत आले आहेत. यापुढेही सर्व जणांनी अशाप्रकारेच सूचना, नियमांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत व गर्दीविना कसे होईल, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. कुठेही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी
ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?
ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. पोलीस स्टेशननिहाय अधिकाºयांचे संपर्क क्रमांकही जाहिर केले आहेत. याशिवाय व्हॉटस् अॅप आणि इ-मेलची सुविधाही उपलब्ध केली आहे.