लाच स्विकारताना पोलीस जमादार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:12 PM2019-07-03T14:12:44+5:302019-07-03T14:12:49+5:30
चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रतिबंधात्मक कारवाईची तिव्रता कमी करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) २ जुलै रोजी रिसोड पोलीस स्टेशन येथे रंगेहात ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार देणारा फिर्यादी आणि त्याच्या भावाविरूद्ध रिसोड पोलीस स्टेशन येथे भादंवी कलम ३२४, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्यांनी रितसर जमानतीदेखील घेतल्या आहेत. या घटनेचा तपास जमादार संजय आमटे करीत असून, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिबंधात्मक कारवाई न करता तहसिलस्तरावरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आमटे यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने १ जुलै रोजी दिली. या तक्रारीवरून पडताळणी केली असता, आमटे यांनी तक्रारदारास पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. २ जुलै रोजी सापळा कार्यवाहीदरम्यान आमटे यांनी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीविरूद्ध रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक पी.टी. डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस.व्ही.शेळके यांचे पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर, पोलीस कर्मचारी नितीन टवलारकर, विनोद सुर्वे, विनोद अवगळे, सुनिल मुंदे, राहूल व्यवहारे, शेख नाविद यांनी पार पाडली.