लाचखोरीत पोलीस आघाडीवर; महसूल कर्मचारी दुसऱ्या स्थानी
By नंदकिशोर नारे | Published: August 10, 2023 03:20 PM2023-08-10T15:20:25+5:302023-08-10T15:21:02+5:30
१८ महिन्यांत २४ कारवाया: विविध विभागातील ३७ आरोपी जाळ्यात
नंदकिशाेर नारे
वाशिम: लाचखोरीच्या प्रकरणात १ जानेवारी २०२२ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील ३७ लाचखोरांवर कारवाई केली असून, त्यात सर्वाधिक संख्या पोलीस विभागातील आहे. यात १२ पोलिसांवर कारवाई करून गुन्हे दाखल झाले आहेत, तर दुसऱ्या स्थानी महसूल विभागाचे कर्मचारी आहेत.
वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०२२ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधित सापळे रचून ३७ जणांची लाचखोरी उघड आणून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, त्यांतील २५ आरोपी लोकसेवकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक पोलिस विभागातील १२ जणांचा समावेश आहे. या लाचखोर पोलिसांनी १० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतच्या लाचेची मागणी तक्रारदारांकडे केली होती. लाच स्विकारण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या इतर लोकसेवक आणि खासगी व्यक्ती मिळून दोघांनाही पकडण्यात आले आहे. याच कालावधित महसूल विभागातील पाच जणांवर लाचेची कारवाई झाली असून, त्यांना मदत करणाऱ्या इतर दोन लोकसेवकांसह आणि खासगी व्यक्ती मिळून चौघांना पकडण्यात आले आहे.
पोलिस व महसूल विभाग कायमच चर्चेत
लाचखोरीबाबत पोलिस व महसूल हे दोन विभाग कायमच चर्चेत असतात. गत १८ महिन्यांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या २५ कारवाईत या दोन विभागातील १७ लोकसेवक, ३ इतर लोकसेवक, तसेच ३ खासगी व्यक्ती मिळून २३ जणांवर कारवाई झाली आहे. त्याशिवाय इतर विभागातील ०८ आरोपी लोकसेवक, ०५ खासगी व्यक्ती आणि एका इतर लोकसवेकावरही कारवाई झाली आहे.
कोणत्याही नागरिकाला त्याचे सरकारी काम करून देण्यासाठी कोणताही लोकसेवक स्वतः किंवा त्याच्यातर्फे एखादा खाजगी इसम पैसे किंवा एखादी लाभाची वस्तू मागत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम येथे संपर्क करावा आपल्याला निश्चितच न्याय देण्यात येईल व आपले संबंधित कार्यालयाकडे प्रलंबित असलेले कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठीही कायदेशीर मदत करण्यात येईल.
- गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम
विभागनिहाय कारवाई
पोलीस विभाग – ०७
महसूल विभाग – ०६
ग्रामविकास विभाग - ०५
पंचायत समिती – ०१
जि.प. आरोग्य विभाग - ०१
भूमी अभिलेख विभाग - ०१
नगर विकास विभाग - ०१
शिक्षण विभाग – ०१
रोहयो विभाग – ०१
एकूण कारवाया - २४
पकडलेले आरोपी लोकसेवक - २५
पकडलेले इतर लोकसेवक - ०४
पकडलेले खासगी व्यक्ती - ०८