वाशिमात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; संशयीत, अटक वारंट असलेले ताब्यात
By दिनेश पठाडे | Published: September 22, 2023 06:31 PM2023-09-22T18:31:17+5:302023-09-22T18:31:28+5:30
सध्या सुरू असलेल्या सणउत्सवाच्या पृष्ठभूमिवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २१ सप्टेंबरच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले.
वाशिम : सध्या सुरू असलेल्या सणउत्सवाच्या पृष्ठभूमिवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २१ सप्टेंबरच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. या अंतर्गत विविध ४२ आरोपींची तपासणी करून ०३ जणांवर १२२ मपोका व ०२ जणांवर १४२ मपोका अन्वये कारवाई करण्यात आली, तसेच २० दारूबंदी कारवायाही करण्यात आल्या. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी रात्री विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
यात संशयितरित्या फिरताना आढळून आलेल्या ०३ जणांवर कलम १२२ मपोका अंतर्गत तर जिल्ह्यातून तडीपार असतानाही जिल्हा हद्दीत वास्तव्य करताना आढळून आलेल्या ०२ जणांवर कलम १४२ मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण २१ निगराणी बदमाश, १५ रेकॉर्डवरील माहितीगार गुन्हेगार, ०६ बीडब्ल्यू, एनबीडब्ल्यू व स्टॅडिंग वारंटच्या आरोपींची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय १८ हॉटेल, धाब्यांचीही तपासणी करण्यात आली आणि दारूबंदी अधिनियम अंतर्गत २० कारवाया तर जुगाराच्या ०५ कारवाया करण्यात आल्या. १३ ठिकाणी नाकाबंदी करुन १४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनसाठी २२ अधिकारी, १७७ अंमलदारांसह १०० होमगार्डचा सहभाग होता.