पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी
By admin | Published: July 6, 2015 02:13 AM2015-07-06T02:13:05+5:302015-07-06T02:13:05+5:30
तपास वाशिम शहर पोलिसांकडे.
वाशिम : रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या २0 वर्षीय विशाल शेलार या युवकाकडे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला ३ जुलै रोजी देशी कट्टा आढळून आला. याप्रकरणी आरोपी शेलार याला वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी शेलार याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाशिम ते मंगरूळपीर मार्गावर पोलिसांची गस्त सुरू असताना गडबडे महाराज यांच्या मंदिराजवळ विशाल शेलार हा संशयितरित्या वावरत असल्याच्या हालचाली दिसल्या. यावेळी शेलार याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ४५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी देशी कट्टा जप्त करून विशाल शेलार याला अटक केली. विनापरवाना अवैधरित्या शस्त्र बाळगणे व गुन्हे करण्याचे उद्देशाने वावरण्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, जमादार उत्तम गायकवाड, प्रदीप चव्हाण, विनोद अवगळे, संदीप इढोळे, योगेश इंगळे, रवी घरत व मधुकर लांभाडे यांचे पथकाने केली. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षकांनी वाशिम शहर पोलिसांना देण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेवरून डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर हे ठाणेदार विजय काकडे यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत.