मारहाणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिसाने मागितली पाच हजाराची लाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:00+5:302021-05-08T04:43:00+5:30
वाशिम : मारहाणीच्या गुन्ह्यात फिर्यादी महिलेसह पतीला मदत करणे आणि जामीन मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस ...
वाशिम : मारहाणीच्या गुन्ह्यात फिर्यादी महिलेसह पतीला मदत करणे आणि जामीन मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ७ मे रोजी शेंदूरजना (ता. मानोरा) येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगरूळपीर तालुक्यातील एक महिला आणि तिच्या पतीविरूद्ध भादंवि कलम ३२३, ३४, ३२४, ५०४ नुसार २४ फेब्रुवारी २०२१ रोजी आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच जामीन देण्यासाठी विक्रमसिंह रमेशसिंह रघुवंशी (३५) या पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, आरोपीने पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने ७ मे रोजी शेंदुरजना दूरक्षेत्र येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडून पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर यांच्यासह चमूने पार पाडली.