पोलीस विभागाच्या कारवाईची दुकानदारांनी घेतली धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2015 01:59 AM2015-06-22T01:59:31+5:302015-06-22T02:39:03+5:30
नियमांचे उल्लंघन करणा-यांची हयगय नाही- पोलीस अधीक्षकाची स्पष्टोक्ती.
वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे रात्री उशिरापर्यंंत प्रतिष्ठान उघडे ठेवणार्या दुकानदारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. वाशिम शहरामध्ये काही महिन्यांआधी रात्री उशिरापर्यंंत प्रतिष्ठाने सुरू राहायची. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी ज्या दिवशी सूत्रभार स्वीकारला त्याच रात्री शहराची पाहणी करीत असताना हा प्रकार आढळून आला. त्यांनी लगेचच पोलिसांना सांगून सर्वांंना सूचना दिल्यात. त्यानंतर मात्र रात्री उशिरा दुकान सुरू राहणार्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने रात्री १0 वाजतापासूनच दुकाने बंद करण्याची घाई दुकानदार करताना दिसून आले. काही दुकानदार अद्यापही उशिरापर्यंंत दुकाने सुरू ठेवत असले तरी, पोलिसांच्या गाडी येण्यावर बारीक लक्ष ठेवून राहत आहेत. पोलिसांची गाडी दिसल्याबरोबर दुकानासमोरील लाईट बंद करणे, बंद करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. रात्री उशिरापर्यंंत सुरू राहत असलेल्या दुकानांमुळे नागरिकांनाही काही दिवस याचा त्रास सहन करावा लागला; मात्र हळूहळू नागरिकांना याची सवय झाल्याचे दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंंत बाहेर फिरणार्यांची मात्र मोठी पंचाईत होत असल्याने ते पोलीस अधीक्षकांच्या नावाने ओरड करताना दिसून येत आहेत.