पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण!
By admin | Published: May 22, 2017 01:22 AM2017-05-22T01:22:57+5:302017-05-22T01:22:57+5:30
धनज बुदु्रक येथे कार्यवाही : वृक्षलागवडीसाठी जागा झाली मोकळी
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु.: येत्या १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड उपक्रमासाठी ‘ई-क्लास’ जमिनींचा वापर करा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, प्रशासनाने रविवारी पोलीस बंदोबस्तात धनज येथील २७० एकर ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवून वृक्षलागवडीसाठी जागा मोकळी करून घेतली.
धनज येथील ‘ई-क्लास’ जमिनीवर गेल्या दहा वर्षांपासून काही लोकांनी शेती प्रयोजनाकरिता अतिक्रमण केले होते. या जमिनीवर तूर, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जात होती. दरम्यान, धनज ग्रामपंचायतीच्या सरपंच परवीन जिकर मोटलाणी, ग्रामसेवक अजय ढोके यांनी ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्त मागविला होता. त्यानुसार, रविवारी पोलीस बंदोबस्तात ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदर सचिन पाटील, गटविकास अधिकारी बी.डी. पवार, लघुसिंचन विभागाचे गव्हाळे, नायब तहसीलदार दीपक गुट्टे, मंडळ अधिकारी शिवानंद कानडे, तलाठी जयंत कांबळे, धनज बु.च्या सरपंच परवीन मोटलाणी, उपसरपंच प्रवीण ठाकरे, ठाणेदार राहुल आठवले आदींच्या उपस्थितीत मोकळ्या करण्यात आलेल्या जागेवर पोकलँड, जेसीबी मशीनद्वारे खड्डे खोदण्यात आले व चर पाडण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती.