प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:35 PM2020-06-14T17:35:18+5:302020-06-14T17:35:29+5:30
प्रतिबंधित ठिकाणी आरोग्य विभागाची चमू तळ ठोकून असून, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या बोराळा हिस्से, निमजगा (ता. वाशिम), भेरा, खेर्डा (ता. मालेगाव), कन्हेरी (ता.रिसोड), सुकळी, शेमलाई (ता.कारंजा) आदी प्रतिबंधित ठिकाणी आरोग्य विभागाची चमू तळ ठोकून असून, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मालेगाव : मालेगाव शहरातील एका भागात तसेच तालुक्यातील खेर्डा, भेरा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला. खेर्डा व भेरा गाव सील करण्यात आले असून येथे बाहेरगावावरून येणाºया व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली तसेच गावातील व्यक्तीला बाहेरगावी जाण्यास मनाई केली. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून, प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे.
कारंजा लाड : महसुल प्रषासनाच्यावतीने कारंजा शहरातील दोन ठिकाण रेड झोन म्हणुन घोषीत करून हा परीसर सील केला तसेच परिसरात नागरीकांना ये जा करण्यासाठी बंदी घालण्यात आल्याची माहीती उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. कांरजा तालुक्यात कोरोना संसर्गाची दादगाव या ठिकाणापासून सुरवात झाली. त्या पाठोपाठ शेमलाई या गावात सुध्दा एक कोरोनाचा रूग्ण सापडला. दादगाव, सुकळी, शेमलाई येथे सर्वेक्षण केले जात असून, आरोग्य विभागाची चमू तेथे ठाण मांडून आहे.
रिसोड : तालुक्यातील कन्हेरी येथे पोलीस बंदोबस्त असून, गाव सील करण्यात आले. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, अजून १२ दिवस सर्व नागरिकांची आरोग्यत तपासणी केली जाणार आहे.
वाशिम : तालुक्यातील बोराळा हिस्से आणि निमजगा, वाशिम हा भाग सील करण्यात आला असून, येथे नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
रुग्ण तपासणी करण्याच्या सूचना
आरोग्य विभागाने कोरोना रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, कर्करोग, आयएलआय अथवा 'सारी'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास या रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला आणावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या.
पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे निर्जंतुुकीकरण करणे, तसेच आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडरचा उपयोग आदी जबाबदारी संबंधित गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर सोपविण्यात आली. स्वस्त धान्यही स्वयंसेवकांमार्फत घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले.