लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:08 PM2019-06-19T12:08:09+5:302019-06-19T12:08:15+5:30
माहिती प्रशासकीय विभागाव्दारे अवगत करण्याऐवजी शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी शर्मा यांनाच २० मे २०१९ रोजी समजपत्र दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सर्वसामान्य जनतेस नाहक त्रास देणारे पोलिस शिपाई संतोष पाईकराव यांची बदली करण्याबाबत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. त्याची माहिती प्रशासकीय विभागाव्दारे अवगत करण्याऐवजी शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी शर्मा यांनाच २० मे २०१९ रोजी समजपत्र दिले. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवर त्यांनाच समजपत्र देण्याची ही पहिलीच घटना माझ्या पाहण्यात आली आहे. याची अत्यंत गंभीर दखल घेवून तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना १८ जून रोजी दिले आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील शिरपूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई संतोष पाईकराव हे सर्वसामान्य जनता व सामाजिक कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारीवरून गोवर्धन शर्मा यांनी दुरध्वनीव्दारे शिरपूर पोलिस निरीक्षकांशी अनेकवेळा चर्चा करून पाईकराव यांना समज देण्याबाबत सांगितले. पाईकराव हे तीन वर्षांपासून शिरपूर पोलिस स्टेशनलाच कार्यरत असून हेतुपुरस्सर सामाजिक कार्यकर्त्यांना ‘टार्गेट’ करित आहेत. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांशीही दुरध्वनीव्दारे संपर्क साधून चर्चा केली. त्याऊपरही पाईकराव यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याने गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे २० जुलै २०१८ रोजी पत्र पाठवून संबंधित पोलिस शिपायाची बदली करण्याची विनंती केली होती. त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय विभागाव्दारे आपणास अवगत करणे आवश्यक असताना शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी आपणास समजपत्र देवून आपला एकप्रकारे अपमान केला, असे पत्र विधानसभा सदस्य गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर करून शिरपूरच्या पोलिस निरीक्षकाविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. त्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.