अपघातात पोलिसाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; काजळेश्वर गावावर शोककळा
By संतोष वानखडे | Published: January 1, 2024 05:55 PM2024-01-01T17:55:20+5:302024-01-01T17:55:55+5:30
सुनील अजाबराव गणेशपूरे यांचे निधन, आणखी एक पाेलिस जखमी
संतोष वानखडे, वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील रहिवासी, माजी सैनिक तथा मानोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील अजाबराव गणेशपूरे (४८) यांचा कर्तव्यावर असताना दुचाकी अपघातात ३१ डिसेंबरला रात्रीदरम्यान मृत्यू झाला. १ जानेवारी रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर काजळेश्वर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मानोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी सुनील गणेशपूरे व प्रविण गव्हांदे हे दोघे माेटारसायकलने मानोरा येथून कारंजाकडे जात असताना ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दापुरासमोरील एका पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये सुनील गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गव्हांदे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशपूर यांच्या मृत्यूची वार्ता कळताच परिवारासह गावावर शोककळा पसरली. याच वर्षी ग्रामपंचायत व गामस्थांकडून त्यांचा भारतीय सैन्य दलाचे माजी सैनीक म्हणून भावपूर्ण सत्कार झाला होता. मोक्षधाम काजळेश्वर येथे १ जानेवारी रोजी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, कारंजा ग्रामीणचे ठाणेदार सुनील वानखडे, मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखडे व पोलीस कर्मचारी, माजी सैनिक संघटनेच्यावतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाने बंदूकीच्या फैरी झाडल्या. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई,दोन भाऊ असा आप्त परीवार आहे.