पोलिस, वकीलांनी दिला ‘दारू सोडा, दुध प्या’चा संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 03:02 PM2019-01-01T15:02:58+5:302019-01-01T15:06:04+5:30
मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली.
मालेगाव (वाशिम) : सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याचा पायंडा अलिकडच्या काळात रुढ होवू पाहत आहे. यामुळे विशेषत: युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढीस लागण्यासह सामाजिक स्वास्थ्य धोक्यात सापडले आहे. ही बाब लक्षता घेवून मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली.
यानिमित्त न्यायालयीन परिसरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान दिवाणी व फौजदारी न्यायाधिश एम.व्ही. मुल्ला होते. विद्यमान दिवाणी व फौजदारी सहन्यायाधिश ए.आर. मुक्कनवार यांची प्रमुख उपस्थिती होती; तर पोलिस ठाण्याच्या आवारातील कार्यक्रमास ठाणेदार पितांबर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्यासह मालेगावचे माजी सरपंच डॉ. विवेक माने, व्यापारी संघटनेचे प्रेम भुतडा, जगदीश बळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना न्या. मुल्ला म्हणाले, की दुध हे शरिरासाठी पोषक असून यामुळे शरीरप्रकृती निरोगी व ठणठणीत राहते. याऊलट दारू प्राशनामुळे शरिराची सर्वच बाजूंनी केवळ हानी होते. याशिवाय या व्यसनामुळे संसाराचीही राखरांगोळी होते. त्यामुळे दारू कायमची सोडून दुध प्यायला लागा, असा सल्ला त्यांनी दिला. इतर मान्यवरांनीही जनजागृतीपर मनोगत व्यक्त केले.