पोलीस कर्मचाऱ्यानेच केली वैमनस्यातून हत्या!
By admin | Published: June 7, 2017 01:47 AM2017-06-07T01:47:29+5:302017-06-07T01:47:29+5:30
तीन आरोपींना अटक : अंजनखेडा खून प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच तथा कंत्राटदार बबन भागवत पायघन (वय ५०) यांची हत्या गावातीलच प्रवीण केशव पायघन याने दोघांच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले. या तिघांनाही ६ जून रोजी अटक केली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन पायघन यांची २६ मे रोजी हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, सुनील अंबुलकर, एस.एम. मानकर, तपास अधिकारी वाठोरे, सहायक पोलीस निरीक्षक वाढवे, किरण साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आरोपींचा शोध लावण्यात यश प्राप्त केले.
पायघन यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार चाकी वाहनाचा शोध लागल्याशिवाय आरोपिंचा शोध घेणे अशक्य होते. त्यामुळे सर्वप्रथम गुन्ह्यात वापरण्यात आलेले चार चाकी वाहन शोधण्यात तपास अधिकारी वाठोरे व राजेश बायस्कर यांना यश आले. मारेकऱ्यांचा मुख्य धागा हाती लागल्यामुळे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेचा मुख्य सूत्रधार असलेला पोलीस शिपाई प्रवीण केशव पायघन व वाहन चालक ओमप्रकाश दीपक रोहणकर (रा. नागपूर) यांना तत्काळ अटक करण्यात आली.
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मुख्य आरोपी पायघन याने वाशिम तालुक्यातील तांदळी बु. येथील दीपक लक्ष्मण कांबळे याचासुद्धा या खून प्रकरणात समावेश असल्याचे उघड झाले. कांबळे याला अटक करण्यासाठी पोलीस पथक तांदळी बु. येथे गेले असता, पोलीस आल्याची चाहूल लागताच कांबळे याने घरावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरविण्यात पोलीस शिपाई ज्ञानदेव म्हात्रे यांना यश आले.
अटक केलेल्या तीनही आरोपींना आज वाशिम जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी तीनही आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या आरोपींकडून मृत पायघन यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, मृताच्या हातामधील अंगठ्या व सोनसाखळी जप्त करणे बाकी आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाठोरे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील रूजू झाल्यापासून कारंजा व वाशिम तालु्क्यात दोन उपसरपंचाच्या हत्या झाल्या. या दोन्हीही हत्येचा तपास करणे अतिशय कठीण होते; परंतु पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्वत: लक्ष घालून दोन्ही हत्येचा उलगडा केला.