पोलिसांनी बुजविले राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:01 PM2018-09-08T18:01:44+5:302018-09-08T18:02:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी: गत काही दिवसांपासून अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे तुटलेले कठडे आणि रस्त्यावरील खड्डे यास कारणीभूत आहेत. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण काही अंशी तरी, नियंत्रणात यावे या उद्देशाने मेडशी पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी हे खड्डे बुजविले.
अकोला-वाशिम महामार्गावर मेडशीपासून मालेगावकडे जाणाºया व मेडशीपासून मालेगावकडे जाणाºया व मेडशीपासून पातूरकडे जाणाºया रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक किरकोळ अपघातही घडले. त्यामुळे मेडशी येथील ग्रामस्थांनी हे खड्डे बुजविले; परंतु पावसाने ते पुन्हा जैसथे झाले. याच मार्गावर २९ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास खड्डे चुकविण्याच्या नादात एका वाहनचालकाने मालेगाव येथील विलास घुगे (३४) या विवाहित तरूणाला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला असून, मृत्यूशी झुंज देत आहे. याच दिवशी सायंकाळी याच मार्गावर मेडशी येथून मालेगावकडे जात असलेले महावितरण कर्मचारी शिवलाल जाधव (५०) यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दोन दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गंभीर घटनांची दखल घेऊन मेडशी पोलिसांनीच ८ सप्टेंबर रोजी या मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजवित सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पवार व हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले यांनी यासाठी पुढाकार घेतला.