जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरील पोलीसांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:10 AM2020-07-17T11:10:21+5:302020-07-17T11:11:49+5:30
शेलुबाजार रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर जेवणाच्या नावाखाली कर्मचारीच दांडी मारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता चेकपोस्टवर तीन पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परंतु वाशिम येथील शेलुबाजार रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर जेवणाच्या नावाखाली कर्मचारीच दांडी मारत असून एका पोलीस शिपायास ठेवून स्वताचे कामे उरकत असल्याचे लोकमतने १५ व १६ जुलै रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले. कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारीही त्याच्या समोरुन परजिल्हयातील वाहने जात असताना , साधी विचारपूस करीत नसल्याचे या दरम्यान दिसून आले.
चेकपोस्टवर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास यासंदर्भात विचारणा केली असता चेकपोस्टवर तिघांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. बुधवारी ३.१५ मिनिटांनी इतर अधिकारी , कर्मचारी कुठे आहेत याची विचारणा केली असता जेवायला गेल्याचे सांगितले. परजिल्हयातील अकोला येथील वाहन (एम.एच.३० पासिंग असलेले) पोलीस कर्मचाऱ्यासमोरुन जात असतांना सुध्दा त्या वाहनाला थांबविण्यात आले नाहीत. शिवाय मोटारसायकलस्वार तर चक्क डबल , तिबल सिट समोरुन जात असतांना त्यांच्याकडे पाहले सुध्दा नाही. अनेकजण विना मास्क जाताना दिसून आले. याबाबत सदर कर्मचाऱ्यास विचारणा केली तर ‘किती समजून सांगावे... कोणी ऐकत नाही’ असे म्हणून बिनधास्त वाहने जावू दिलीत. यावरुन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जिल्हा कडक बंदीच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतिने ‘खो’ दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
असे केले स्टिंग ऑपरेशन
परजिल्हयातील कोणतेच वाहन शहरात येवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयात जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर कोणत्याच वाहनांची तपासणी केल्या जात नसल्याच्या माहितीवरुन लोकमतच्यावतिने १५ व १६ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन केले. अकोला रस्त्यावरील तसेच वाशिम ते मंगरुळपीर मार्गावरील शेलुबाजार रस्त्यावरील चेक पोस्टवर छायाचित्र काढेपर्यंत कोणीच नव्हते. छायाचित्र काढून झाल्यानंतर एक पोलीस कर्मचारी आला, तेव्हा अनेक वाहने विना तपासणी निघून गेले होते. पोलीस कर्मचारी आल्यानंतरही समोरुन वाहने जात असतांना वाहनांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही.
शहरात बिनधास्त शिरताहेत जिल्हा बाहेरील वाहने
वाशिम शहरात जिल्हाबाहेरील येणाºया वाहनांना कोणीही अटकाव करीत नसल्याने बिनधास्त वाहने शहरात येताना दिसून येत आहेत.
बागवान पुरा येथे झालेल्या घटनेतील आरोपी मोठया संख्येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीयेमुळे चेकपोस्टवरील काही कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले होते. त्यावेळी ते कदाचित गैरहजर आढळले असावेत. दररोज चेक पोस्टवर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर असतात. विशेष म्हणजे मी स्वत: पेट्रोलिंग करतांना आढळून येतात.
- योगीता भारव्दाज, ठाणेदार , वाशिम