आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दमछाक!
By admin | Published: May 30, 2017 01:36 AM2017-05-30T01:36:42+5:302017-05-30T01:36:42+5:30
शहर पोलिसांचा तपास : संशयित आरोपीची पडताळणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - तालुक्यातील अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन भागवत पायघन (वय ५५) यांची अज्ञात इसमांनी २६ मे रोजी तीक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली होती. या घटनेतील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे कामानिमित्त घोडबाभूळ शिवारात असलेल्या शेताकडे सकाळी मोटारसायकलने फेरफटका मारायला गेले होते. शेताकडे जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची तीष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. त्यांच्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, असा एकूण अंदाजे दोन लाखांचा ऐवजही लंपास केला.
या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविद्ध भादंविचे कलम ३०२ व ३९७ अन्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांचे दोन पथक तपासासाठी परिसरात पाठविले आहेत. मृतक पायघन यांचे कुणासोबत वैमनस्य होते? शेती किंवा रस्त्याचा काही वाद होता काय? इतरही काही संशयित बाजू पोलीस तपासत आहेत. हा खून ‘सुपारी’ देऊन केला काय ? याचीही चाचपणी सुरू आहे.
उपसरपंच हत्या प्रकरणाचा आम्ही कसून शोध घेत आहोत. या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यासाठी आम्ही दोन पोलीस पथके तयार केली आहेत. पोलीस पथक सर्व बाजू पडताळून आरोपींचा निश्चितच शोध लावण्यात यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे.
- एस. एम. मानकर, ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन