पोलिसांनी कारंजात पकडले ६४ ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:26 PM2021-04-27T12:26:45+5:302021-04-27T12:27:05+5:30

Police seized 64 oxygen cylinders : ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६  लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

Police seized 64 oxygen cylinders in the Karanja City | पोलिसांनी कारंजात पकडले ६४ ऑक्सिजन सिलिंडर

पोलिसांनी कारंजात पकडले ६४ ऑक्सिजन सिलिंडर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : एकिकडे बाधितांसह कुटुंबियांची ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ होत असताना, दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणारे वाहन संशयास्पदरित्या आढळल्याचा प्रकार कारंजा शहरात सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६  लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
नागपूर-औरंगाबाद शीघ्रगती मार्गावरील कारंजा येथील यशोतिरथ काॅलनीमधील महाराष्ट्र नगरातील एका ठिकाणी संशयितरित्या एका पिकअपमधून ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, याठिकाणी (एमएच २९ एटी  ०८१८) क्रमांकाच्या पिकअपमधून (एमएच २१, ६००१) क्रमांकाच्या ट्रकमध्ये काहीजण ऑक्सिजन सिलिंडर भरताना दिसून आले. याबाबत खात्री केली असता, पिकअपमध्ये २९, ट्रकमध्ये २६ तर संबंधित दुकानात ९ रिकामे सिलिंडर  आढळले. दुकानमालक रियाज अहेमद गुलाम रसुल (४०, रा. झोया नगर, कारंजा) यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे सिलिंडर व्यवसायाचा परवाना असून, हा परवाना न्यू हिंदूस्थान एजन्सी, नागपूर-औरंगाबाद हायवे, महाराष्ट्र नगर, कारंजा या नावे असल्याचे दिसून आले. तसेच सिलिंडरबाबत विचारणा केली असता, त्यांनी हे सिलिंडर नागपूर येथून खरेदी केल्याचे सांगितले. 
कागदपत्रांची विचारणा केली असता, हे सिलिंडर जवाहर हाॅस्पिटल, कारंजाच्या नावे खरेदी केल्याचे दिसून आले. यावेळी अधिक विचारपूस केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा मुद्देमाल कारंजा शहर पालीस स्थानकात जमा करण्यात आला आहे. या कारवाईचा जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजय वाढवे, किशोर चिंचोडकर, अमोल इंगोले, मुकेश भगत, प्रवीण राऊत व राम नागुलकर यांनी केली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे कारंजावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Police seized 64 oxygen cylinders in the Karanja City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.