पोलिसांनी पकडला तांदळाचा अवैध साठा, तांदूळ आणि चार वाहनांसह १६ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त
By दादाराव गायकवाड | Published: September 29, 2022 05:04 PM2022-09-29T17:04:49+5:302022-09-29T17:05:11+5:30
Crime News: काळ्या बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवलेला ९५ हजार २२० रुपये किमतीचा तांदूळ आणि चार वाहनांसह एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपयांचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने कारंजा पोलिसांच्या हद्दीतील काेळी येथून जप्त केला
- दादाराव गायकवाड
वाशिम - काळ्या बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवलेला ९५ हजार २२० रुपये किमतीचा तांदूळ आणि चार वाहनांसह एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपयांचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने कारंजा पोलिसांच्या हद्दीतील काेळी येथून जप्त केला असून, तांदळासह वाहने कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये २९ सप्टेंबर रोजी जमा करण्यात आली आहेत.
प्राप्त माहितीनुसार वाशिम गुन्हे शाखेचे पोलीस कारंजा शहर पोलिसांच्या हद्दीत २८ स्प्टेंबर रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना २ वाजताच्या सुमारास कोळी येथील भागात अमिर मदार गुगीवाले (वय ३२ वर्षे) रा. कोळी याने त्याच्या ताब्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरीत करण्यात येणारा तांदळाचा अवैधरित्या विना परवाना साठा करून ठेवला आहे. यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन पंचासमक्ष पाहणी केली असता तेथे दोन मोठ्या आणि दोन लघू मालवाहू वाहनांत तांदळाचे प्रत्येकी ७० किलो वजनाचे ९५ हजार २२० रुपये किमतीचे ७९ कट्टे आढळले. चौकशी करून आरोपीकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे वा शासनाने जारी केलेला परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी १५ लाख ६४ हजार रुपये किमतीची चार वाहने आणि ७९ कट्टे तांदूळ मिळून एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपये किमतीचा ऐवज जप्त करीत कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे. या प्रकरणी संबंधिताने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तहसीलदारांना दिले पत्र
वाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या अवैध तांदळाच्या घटनेबाबत कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांना पत्र सादर करून माहिती दिली असून, पकडलेला तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही, याची चौकशी करून तांदळाचा अवैध साठा करणारा इसम अमिर मदार गुगीवाले याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.