जांब येथील अपहरण केलेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:42 PM2020-03-05T17:42:32+5:302020-03-05T17:42:44+5:30
१४ फेब्रुवारी रोजी जांब येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांब येथील अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना ५ मार्च रोजी यश मिळाले आहे. शिरपूर पोलिसांनी पुणे येथून आरोपीसह सदर मुलीला ताब्यात घेतले.
१४ फेब्रुवारी रोजी जांब येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी भादंवी कलम ३६३ नुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून शिरपूर पोलीस हे मुलीचा शोध घेत होते. सदर मुलगी ही जांब येथील रहिवासी तथा पुण्यात काम करणाºया एका व्यक्तीच्या संपर्कात आली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. संपर्कात आलेल्या व्यक्तीला शिरपूर पोलिसांनी चौकशीसाठी शिरपूर पोलिस ठाण्यात ५ मार्च रोजी बोलावून घेतले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सदर मुलीचा पुण्यात शोध घेतला असता ते पुणे येथे पळवून नेणाºयासह आढळून आली. सदर मुलीला आरोपीसह सध्या शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशावरून तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाघमारे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, पोलीस कर्मचारी गंगाधर आडानी व गोपनारायण यांच्या पथकाने केली.