आठ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 06:41 PM2020-12-21T18:41:24+5:302020-12-21T18:41:35+5:30
अनसिंग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले.
वाशिम : भादंवी कलम ४९८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अनसिंग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले तर खासगी वकिलाचा कारकून फरार होण्यात यशस्वी झाला.
मानोरा तालुक्यातील गुंडी येथील ३५ वर्षीय इसमाला भादंवी कलम ४९८ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अनसिंग पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिल माणिकराव भगत (५०) व खासगी वकिलाचे कारकून पांडुरंग तुकाराम नागरे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ७ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे सिद्ध झाले. २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला असता, आरोपींना संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी अनिल भगत याला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. आरोपीविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत २०१८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.