जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीने तापले राजकारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:18 AM2017-08-28T01:18:38+5:302017-08-28T01:18:46+5:30
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील राजकारण तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त तीन जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील राजकारण तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदारसंघातून ही निवडणूक होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. जवळपास १00 च्या आसपास मतदार आहेत. २२ ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसून, २८ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज दाखल होतात, यावर या निवडणुकीतील लढती अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साधारणत: १0 महिन्यांपूर्वी वाशिम, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कारंजाचा अपवाद वगळता वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेत शिवसेना-भाजपा या पक्षाने बर्यापैकी जागा मिळविल्या, तर कारंजा नगर परिषदेत भारिप-बमसंने सर्वाधिक जागा मिळवित निर्विवाद सत्ता हस्तगत केली. रिसोड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडून येण्यासाठी सदस्य संख्या जुळविण्यात शिवसेना, भाजपा, भारिप-बमसंसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ ऑगस्ट २0१७ पयर्ंत जिल्हाधिकार्यांकडे अपील करता येणार आहे. अपिलानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर असून, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान होईल. १५ सप्टेंबर २0१७ रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती होते, की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारंजा, वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्यांदाच भारिप-बमसंचा उमेदवार पाठविण्याच्या दृष्टीने भारीप-बमसंनेही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीनही नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांचे कसब पणाला लागणार, असे बोलले जात आहे.