नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:45 PM2019-07-19T16:45:28+5:302019-07-19T16:45:39+5:30
पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शुक्रवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, ३० जुलै २०१९ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शुक्रवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, नायब तहसीलदार पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी या शासकीय सुट्टीच्यादिवशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यादिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठीचे अर्ज स्वीकारण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी आपले नाव मतदार यादीत असले तरी अथवा यापूर्वी आपण मतदान केले असले तरी प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे तपासावे. या मतदार यादीत नाव नसल्यास नवीन अर्ज भरून देवून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.