वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण तापले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 10:36 AM2020-12-14T10:36:14+5:302020-12-14T10:39:59+5:30
Gram Panchayt Election : या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून, गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर निवडणूक स्वतंत्र आघाडी, पॅनलच्या माध्यमातून लढवायची की पक्षाच्या झेंड्याखाली? याबाबत चारही प्रमुख पक्षांत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येतील, असे वरिष्ठ स्तरावरून यापूर्वीच जाहीर केलेले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात आल्या होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जाईल की नेहमीप्रमाणे स्वतंत्र पॅनल, आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, याकडे इच्छुक उमेदवारांसह मतदारांचे लक्ष लागून आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला. १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकमुळे राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी ‘गॉड फादर’च्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.