पाण्याअभावी शेतकऱ्याने तोडली डाळींबाची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:48 PM2019-05-20T17:48:14+5:302019-05-20T17:48:18+5:30
येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूंगळा (वाशिम) : सततची नापिकी, तीन वर्षांपासून कमी झालेले पर्जन्यमान, उत्पन्नापेक्षा लागवड व संगोपन खर्च जास्त आदी कारणामुळे मुंगळा येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे. डाळींबाच्या ३५० पैकी आतापर्यंत १२५ च्या आसपास झाडे तोडली असून, अद्याप कृषी किंवा महसूल यंत्रणेने पंचनामा केला नाही.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच संत्रा, डाळींब या फळबागेलाही प्राधान्य दिले आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी अनंता कुटे यांनी सहा, सात वर्षांपूर्वी एका एकरात डाळींबाची जवळपास ३५० झाडांची लागवड केली होती. विदर्भ कोकन ग्रामीण बँकेचे वैयक्तीक सर्वांच्या नावावर दीड लाख रुपये कर्ज काढुन विहीर व एक एकरावर डाळीबांची ३५० झाडांची लागवड केली. पहिल्या एक, दोन वर्षी बºयापैकी उत्पादन आले. पण कमी बाजारभावामुळे लागवड खर्च वजा जाता जेमतेम उत्पन्न मिळाले. डाळींबाची झाडे डोलदार असल्यामुळे हिम्मत न हरता त्यांनी वाटचाल ठेवली. गत तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने डाळींब बाग जगविण्याची कसरत कुटे यांना करावी लागत आहे. प्रकल्प व धरणातही पाणी नसल्याने सुरूवातीच्या काळात टँकरने पाणी देऊन डाळींब बाग जगविण्याचा प्रयत्न केला. परंतू, उत्पन्नापेक्षा संगोपन खर्च जास्त येत असल्याने कुटे यांच्यापुढे आर्थिक पेच निर्माण झाला. डाळींब बाग जगविण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे शासन, प्रशासनाने लक्ष दिले नाही, असे अनंता कुटे यांनी सांगितले. यावर्षी भीषण पाणीटंचाई असल्यामुळे झाडाला फारशी फळधारणा झाली नाही. एप्रिल महिन्यापासून विहिर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने आणि सिंचनाचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजास्तव डाळींबांची झाडे तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कुटे यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १२५ झाडे तोडली असून, कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप पंचनामा केला नाही, असा दावाही कुटे यांनी केला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, फळबाग उत्पादक शेतकºयांना अनुदान द्यावे, अशी मागणीही कुटे सोमवार, २० मे रोजी यांनी केली.