गरिबांचा बर्गर, पिझ्झा असलेल्या समोसा, कचोरीची प्लेट २५ रुपयांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:33+5:302021-08-29T04:39:33+5:30
वाशिम : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा परिणाम स्वयंपाक गृहाच्या बजेटवर झाला असतानाच नाश्त्याच्या दरातही एका ...
वाशिम : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा परिणाम स्वयंपाक गृहाच्या बजेटवर झाला असतानाच नाश्त्याच्या दरातही एका प्लेटमागे दीडपट ते दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली असून, समोसा, कचोरीच्या प्लेटचे दर १५ रुपयांहून थेट २५ ते ३० रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. त्याचा परिणाम उपाहारगृहे आणि हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. सोयाबीन तेलाचे दर सद्यस्थितीत १५५ ते १६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. रिफाईंड तेल, शेंगदाणा तेल, करडई तेल, तिळाचे तेल व जवसाच्या तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. शिवाय मैदा, बेसन, डाळी, साखर, रवा आदी कच्च्या मालाचे दरही गगनाला भिडल्याने उपाहारगृह चालकांचा व्यवसाय कठीण झाला आहे. नाश्त्याचा प्रत्येकच पदार्थ आता महागल्याने ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली आहे.
-------
म्हणून महागला समोसा, कचोरी
गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलांसह नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या दरात समोसा, कचोरी, भजी आदी पदार्थ विकणे उपाहारगृह चालकांना परवडणारे राहिले नसल्यानेच या पदार्थांचे दर वाढले आहेत.
---------------
भजी, समोशाशिवाय दिवस जाणे कठीण
१) कोट : सकाळी कामाला घरून निघाल्यानंतर रस्त्यावरच्या उपाहारागृहात समोसा, भजी घेऊन नाश्ता करायची सवयच पडली आहे. आता हे पदार्थ महागल्याने खिशावर ताण येत आहे. त्यामुळे आता घरी पोहे किंवा इतर पदार्थ खाऊन घराबाहेर पडतो; परंतु समोसा, भजीशिवाय दिवस कठीण जात आहे.
- सलीम कालीवाले,
सर्वसामान्य ग्राहक,
२) कोट : गेल्या चार महिन्यांपासून भजी, समोसा, कचोरीचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. आम्हा कामगारांना पूर्वी हे पदार्थ खाऊन दुपारपर्यंत काम करणे अवघड नव्हते; परंतु आता या नाश्त्याचा खर्च परवडणारा राहिला नाही. उपाहारगृहाच्या नाश्त्याची सवय झाल्याने थोडे अवघड झाले आहे.
-विजय आसरे,
सर्वसामान्य ग्राहक
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कोरोनाचा मोठा फटका
१) कोट : गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढले असतानाच दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे आमचा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली असून, अपेक्षित संख्येने ग्राहक आता उपाहारगृहात येत नाहीत.
-राम महाराज जोशी,
उपाहारगृह चालक
-------------
२) कोट : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे आमच्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्राहकांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यात तेलाचे आणि पदार्थ बनविण्याच्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे व्यवसाय करणेच कठीण झाले आहे.
-गट्टूशेठ सुखाडिया,
उपाहारगृह चालक