शिरपूर-वाशिम मार्गावरील पुलाची पुरामुळे दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:01+5:302021-06-24T04:28:01+5:30
शिरपूर परिसरातील लोकांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा शिरपूर करंजी, ब्राह्मणवाडा, तामशी, वाशिम हा रस्ता आहे. या रस्त्याने विविध वाहनांनी ग्रामीण ...
शिरपूर परिसरातील लोकांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा शिरपूर करंजी, ब्राह्मणवाडा, तामशी, वाशिम हा रस्ता आहे. या रस्त्याने विविध वाहनांनी ग्रामीण भागातील नागरिक वाशिम येथे ये-जा करतात. दरम्यान, या रस्त्याची आधीच मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असताना चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ब्राह्मणवाडा येथील पुलाचा जवळपास अर्धा भाग वाहून गेला. त्यामुळे हा पूल आता वाहतुकीकरिता धोकादायक ठरत आहे. असाच प्रकार अमानी-रिठद मार्गावरील दापूरी खुर्दनजीक घडला आहे. पुलावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे डांबर वाहून गेल्याने गिट्टी उघडी पडली आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
..................
९.२५ कोटींचा निधी मंजूर; पण प्रश्न ‘जैसे थे’
शिरपूर ते ब्राह्मणवाडा या नऊ किलोमीटर अंतराच्या रस्ता कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केंद्रीय रस्ते विकास निधीतून ६ कोटी, तर आमदार अमित झनक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून ३.२५ कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्यास मोठा कालावधी होऊनही रस्त्याचे काम मार्गी लागले नसून हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.