केनवड परिसरातील पाणंद रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:41+5:302021-04-05T04:36:41+5:30
शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित शिरपूर : अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित ...
शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
शिरपूर : अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सदर मागण्या निकाली काढण्याची मागणी सतीश सांगळे यांनी शुक्रवारी शिक्षण विभागाकडे केली.
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
रिसोड : महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता अद्याप तयार झालेला नाही. महागाव ते सोनाटी शीवपर्यंत खडीकरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
मेडशी : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग पिकाचे अतोनात नुकसान झाले. तसेच यावर्षी देखील १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या गारपिटीने पिकांची अतोनात हानी झाली. असे असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप शासनस्तरावरून मदत मिळालेली नाही.
पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्या
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊंड लेवल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत आहेत. त्यांचे मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी केली.
ग्रामीण भागात पाणी टंचाई
जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे भागात ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा अनियमित असल्याने येथे पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
उकळीपेन येथे ‘एटीएम’चा अभाव
अनसिंग : वाशिम तालुक्यातील तुलनेने अधिक लोकसंख्या असलेल्या तथा हिंगोली-वाशिम या महामार्गावर वसलेल्या उकळीपेन या गावात ‘एटीएम’ची गरज भासत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
उघड्यावर शौचवारी; कारवाईची मागणी
शेलुबाजार : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कार्ली परिसरात वीज पुरवठ्यात व्यत्यय
वाशिम : परिसरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बागायतदार शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्प्रिंकलरचा वापर करून पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र, वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे अडचण उद्भवली आहे.
हळद खरेदीची व्यवस्थाच नाही
मालेगाव : जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता.मालेगाव) परिसरात असंख्य शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले आहे. यामाध्यमातून चालूवर्षी लाखो क्विंटलचे उत्पादन देखील झाले आहे, मात्र अपेक्षित दर न मिळण्यासोबतच बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
मेडशी परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला पिकांची लागवड केली; मात्र माकड, रोही, हरीण यासारख्या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले आहेत.
किन्हीराजा येथे लसीकरण मोहीम
वाशिम : मालेगाव-कारंजा रस्त्यावर असलेल्या किन्हीराजा येथे ज्येष्ठ नागरिकांनंतर आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. ही मोहीम येथे सुरू करण्यात आली आहे.
ऊस उत्पादकांना दिलासा
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढले असतानाही अद्यापपर्यंत लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे अन्य व्यापारासह रसवंतीही सुरू आहेत. यामुळे विक्री वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (पान ४)