वनोजा फाटा-वनोजा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:33+5:302021-01-22T04:36:33+5:30
वनोजा फाटा - वनोजा हा रस्ता वनोजातून पुढे पिंजरमार्गे मूर्तिजापूरकडे जाणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे अकोला येथून पिंजरमार्गे मूर्तिजापूरकडे ...
वनोजा फाटा - वनोजा हा रस्ता वनोजातून पुढे पिंजरमार्गे मूर्तिजापूरकडे जाणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे अकोला येथून पिंजरमार्गे मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. यात शेतीकामासाठी धावणारी वाहने. शेलूबाजार येथील आठवडी बाजार व कृषी उत्पन्न उपबाजारात जाणारी वाहने, सोबतच वनोजा येथील शाळा, महाविद्यालय, निवासी वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, संस्था, पतसंस्था आणि बँकेच्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती चांगली असणे गरजेचे आहे; परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. गेल्या १५ वर्षांत केवळ एकदा या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी केली होती. तेव्हापासून संबंधित यंत्रणेचे या रस्त्याकडे दुर्लक्षच आहे. प्रत्यक्षात या रस्त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असताना त्याची दखल घेण्यात येत नाही. परिणामी, या रस्त्यावर वाहन चालविताना चालकांची चांगलीच कसरत होत आहे. वाहनचालक खड्डे चुकवून रस्त्याच्या कडेने वाहन नेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पादचारी ग्रामस्थांनाही जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. एखादवेळी या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
-------
कामासाठी खडीचे ढिगारे, सुरुवात मात्र नाही !
वनोजा फाटा - वनोजादरम्यानच्या जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्ता कामाला मंजुरी मिळाली असून, गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कडेला खडीही आणून टाकण्यात आली. त्यामुळे या रस्त्याचे काम होण्याची आशा ग्रामस्थांना वाटू लागली; परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे रस्ता कामाला मंजुरी मिळाली की नाही, असा संभ्रमही निर्माण झाला आहे.
===Photopath===
210121\21wsm_1_21012021_35.jpg
===Caption===
वनोजा फाटा-वनोजा रस्त्याची दूरावस्था