सीईओंच्या रडारवर आता 'निकृष्ट बांधकाम', जे.ई.ला कारणे दाखवा; ठेकेदाराला दंड!
By संतोष वानखडे | Published: May 16, 2024 07:34 PM2024-05-16T19:34:56+5:302024-05-16T19:35:05+5:30
जोगेश्वरी येथील बांधकाम पाडण्याचे निर्देश : धाबे दणाणले
वाशिम : आरोग्य, शिक्षण, पंचायत, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागानंतर आता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रडारवर जि.प. शाळा, वर्गखोल्यांची निकृष्ट बांधकामे आल्याचे दिसून येते. जोगेश्वरी (ता.रिसोड) येथील भेटीदरम्यान वर्गखोलीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या कारणावरून संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना (जे.ई.) कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदाराला दंड आकारण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले.
प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व गाईडलाईननुसार कामकाज करावे, गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शक कामकाजाची कास धरावी यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिल्याचे दिसून येते. त्याअनुषंगाने बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील कामकाजात सुधारणा करीत अपेक्षित ‘रिझल्ट’ देण्याला प्राधान्य दिले. सुरूवातीला शिक्षण, महिला व बालकल्याण, पंचायत, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन विभागावर फोकस झाला. आता वर्गखोल्यांची बांधकामे रडारवर आल्याचे बोलले जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी जोगेश्वरी येथील जि.प. शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात वर्ग खोलीचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकामाची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तिथे उपस्थित इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने आपल्या हाताने बांधकामाचा कॉलम अलगद उकरल्याने या कामातील फोलपणा उघडकीस आला. सीईओ वाघमारे यांनी निकृष्ट बांधण्यात आलेले कॉलम पाडून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश दिले. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंता (जे.ई.) राम आदमने यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे तसेच संबंधित ठेकेदार नितीन केनवडकर यांना कामाच्या रकमेच्या १० टक्के एवढा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेची गंभीर दखल इतर ठेकेदार व अभियंता यांनी घ्यावी आणि अंदाजपत्रकानुसार दिलेल्या मानांकनानुसार दर्जेदार काम करावे असे आवाहन सीईओ वाघमारे यांनी केले.