नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:15 PM2017-10-23T13:15:55+5:302017-10-23T13:17:23+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थींना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाने तातडीने शेतपिकाचे पंचनामे करावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.
वाशिम - पावसातील खंड व परतीच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थींना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाने तातडीने शेतपिकाचे पंचनामे करावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना नानाविध समस्या, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यंदाचे वर्ष हे शेतकºयांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक ठरले असून गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबिनचे प्रतिक्विंटल २०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतू त्यातही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकºयांना सामना करावा लागला. खरीप हंगामातही सुरूवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबिनची पार दाणादाण उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर मात करित शेतकºयांनी सोयाबिनची सोंगणी केली आहे; परंतू सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून झालेला लागवड खर्च देखील वसूल होणे कठीण झाले आहे. परतीच्या पावसानेदेखील सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना नुकसानभरपाईची नितांत आवश्यकता आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून जिल्हा प्रशासन व विमा कंपनीने संयुक्तरित्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी केली आहे.