अन्न भेसळ रोखण्यासाठी हवी सकारात्मक मानसिकता!
By Admin | Published: October 16, 2016 02:27 AM2016-10-16T02:27:45+5:302016-10-16T02:27:45+5:30
भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे जनजीवन सापडतेय धोक्यात
वाशिम, दि. १५- कमी खर्चात अधिक नफा मिळविण्याच्या हव्यासापायी विक्रेत्यांकडून विविध खाद्यपदार्थांंमध्ये भेसळ केली जाते. या गंभीर प्रकारामुळे मात्र जनजीवन धोक्यात सापडत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सकारात्मक मानसिकतेची नितांत गरज भासत आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ सेवनात आल्याने असाध्य आजारांना आयते निमंत्रण दिले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी याबाबत तारतम्य बाळगायला हवे. सोबतच प्रत्येक कुटुंबाने तद्वतच घरातील गृहिणीने अन्नपदार्थांंंमधील भेसळ ओळखण्याचे तंत्र आत्मसात करण्याची वेळ आज खर्या अर्थाने ओढवली आहे.
अन्न भेसळ समस्येचा विचार करताना अन्न व भेसळ या दोन शब्दांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अन्न हा शब्द उच्चारल्यानंतर जेवणातील विविध खाद्यपदार्थ डोळ्यापुढे उभे राहतात. शरीराचे पोषण करण्यासाठी उपयोगात येणार्या विविध पदार्थांंंचा त्यात समावेश होतो; तर भेसळ म्हणजे शुद्ध अवस्थेतील किंवा मूळ अवस्थेतील अन्नपदार्थात इतर घटक मिसळणे अथवा मूळ पदार्थातील महत्त्वपूर्ण घटक कमी करणे म्हणजे अन्नपदार्थातील भेसळ म्हणता येईल. साधारणत: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कणिक, मैदा आदींमध्ये खडे, वाळू, माती, जास्तीचा कोंडा, खडूची भुकटी, निकृष्ट प्रतिचे धान्य वापरून भेसळ केली जाते. हरभर्याची डाळ, तुरीची डाळ, बेसन यामध्ये लाखीची डाळ, पिवळा रंग, मक्याचे पीठ, लाखीच्या डाळीचे पीठ हे पदार्थ वापरून भेसळ केली जाते. तसेच रव्यामध्ये लोहकण वापरून भेसळ करतात. हळद, तिखट, मोहरी, जिरे, धन्याची भुकटी यामध्ये पिवळी माती, स्टार्च, भुसा, गेरू, पिवळय़ा धोत्र्याच्या बिया, जिर्यासारख्या दिसणार्या दुसर्या बिया वापरून अनेक जण भेसळ करतात. दालचिनीमध्ये झाडाच्या साली वापरून भेसळ केली जाते; तर आमचूर व ओव्यामध्ये बारीक वाळू, माती मिसळवून भेसळ करतात. हिंगामध्ये डिंक माती टाकून भेसळ होते. कॉफीमध्ये चिंचोक्याची भुकटी मिसळून अनेक जण भेसळ करतात.