वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:34 PM2018-07-17T14:34:53+5:302018-07-17T14:35:58+5:30
वाशिम: विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सुचना दिल्या असून, नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशाराही देण्यात आला आहे.
यंदा वाशिम जिल्ह्यात जुनच्या पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात १ जून ते १७ जूनदरम्यान जिल्ह्यात ३०१.८० मि.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ४६५.१७ मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५८.२४ टक्के आहे. अर्थात अर्ध्या पावसाळ्यातच पावसाची टक्केवारी निम्म्याहून अधिक झाली आहे. सततच्या पावसामुळे पिके आधीच संकटात असताना आता पुन्हा पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सुचित करून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे, तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन विभागालाही दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले.