स्वतंत्र जागेअभावी शवविच्छेदनगृह प्रलंबित
By admin | Published: October 29, 2014 01:28 AM2014-10-29T01:28:58+5:302014-10-29T01:28:58+5:30
अनसिंगचे ग्रामीण रुग्णालय, कुटुंबीयांसह पोलिस कर्मचार्यांची गैरसोय.
अनसिंग (वाशिम): सहा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अनसिंग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनगृहाची सुविधा उपलब्ध होऊ शकली नसल्याची शोकांतिका आहे. शवविच्छेदनगृह नसल्याने सामान्य नागरिक तथा पोलिस कर्मचार्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनसिंग पोलिस स्टेशन अंतर्गत जवळपास ४0 गावे येतात. पोलिस स्टेशन अंतर्गत नेहमीच लहान-मोठे गुन्हे घडतात. तसेच कधी कधी आकस्मिक मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे अनिवार्य ठरते. अनसिंग येथे ग्रामीण रुग्णालय आहे; मात्र या ठिकाणी ही सुविधा नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम गाठावे लागते. वाशिम येथे मृतदेह घेऊन जाणार्या मृतकाच्या नातेवाइकांना वाशिमला जाण्यासाठी खासगी शववाहिका किंवा अन्य वाहन खर्चाची झळ सोसावी लागते; तसेच पोलिस कर्मचार्यांना त्यांच्यासोबत जावे लागते. वाशिम येथे घेऊन जाताना वेळ आणि पैसा गमवावा लागतो. येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन शवविच्छेदनगृह सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. शवविच्छेदनाकरिता लागणारी जागा ग्रामीण रुग्णालयाजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे सदर केंद्र सुरु होऊ शकले आहे. जुनी इमारत याकरिता योग्य नसल्याचे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जागेअभावी ही सुविधा उपलब्ध होऊ शकली नसल्याची शोकांतिका आहे. जागेसाठी सर्वांगीण प्रयत्न होत नसल्याचा फटका बसत आहे.