पोहरादेवीतील नवीन कामांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:33 PM2019-12-13T12:33:47+5:302019-12-13T12:34:05+5:30
नव्याने मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश रोखण्यात आले असून कामांना तुर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवीला महाराष्ट्रातील इतर प्रसिद्ध देवस्थानांप्रमाणे पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी तत्कालिन शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला. त्यातून विकासात्मक कामे सुरु आहेत; मात्र नव्याने मंजूर झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश रोखण्यात आले असून कामांना तुर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.
संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळाने पुणीत झालेल्या पोहरादेवीशी बंजारा समाजातील लाखो भाविकांची श्रद्धा जुळलेली आहे. पोहरादेवीला माथा टेकण्यासाठी लाखो भक्त दरवर्षी येथे येतात. भक्तगणांची सोय व्हावी तथा बंजारा समाजामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या नंगारा या पारंपरिक वाद्याच्या प्रतिकृतीसह ‘नंगारा भवन’ बांधण्याचे कामही जोरासोरात सुरू आहे; मात्र नव्याने मंजूर झालेल्या; मात्र कार्यारंभ आदेश न दिलेल्या कामांना शासनाच्या सचिवांनी स्थगिती दिली असून यामुळे भाविकांमुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
पोहरादेवी येथे ज्या नवीन कामाना अद्यापपर्यंत कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत, अशाच कामाना शासनाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे. त्यात जुनी मात्र मात्र विनासायास सुरूच राहणार आहेत. नवीन कामांना कार्यारंभ आदेश आणि निधीची तरतूद झाल्यानंतर ही कामे देखील सुरू होतील.
- शेषराव बिल्लारी
शाखा अभियंता, मानोरा