‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या १०० गावात संभाव्य पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:12 PM2020-03-03T12:12:58+5:302020-03-03T12:13:43+5:30
१०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानातर्गंत गत चार वर्षात जिल्हयातील जवळपास ६०० गावे वॉटर न्यूट्रल (जलपरिपूर्ण) ठरलेली आहे. यापैकी १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्यातून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात गत चार वर्षात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जातात.
सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने यामधील ६०० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. पाण्याची गरज भागेपर्यंत कमतरता नाही आणि अतिरिक्त पण नाही, अशा गावांना ‘वॉटर न्यूट्रल’ (जलपरिपूर्ण) म्हटले जाते. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या १०० गावांत संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याने तेथे विहिर अधिग्रहण, टँकर, हातपंप आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० आणि सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्या गावाला पाण्याची नेमकी गरज किती आहे, तेथे गरजेऐवढे पाणी उपलब्ध असेल तर त्या गावाचा समावेश वॉटर न्यूट्रलच्या यादीत केला जातो. जिल्ह्यात ६०० च्या जवळपास गावे वॉटर न्यूट्रल आहेत. उन्हाळ्यात जेथे कुठे पाणीटंचाई निर्माण होईल, तेथे उपाययोजना राबविताना ‘वॉटर न्यूट्रल’ यादीची अडचण भासणार नाही. यापुढेही अन्य योजनांमधून जलसंधारणाची कामे होतील. - एस.एम. तोटावर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीख वाशिम