टो येथील युवा शेतकऱ्यांनी धरली कुक्कुटपालनाची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:39+5:302021-07-03T04:25:39+5:30
टो या गावाची ओळख काही वर्षांपूर्वी रेशीम कोश उत्पादकांचे गाव म्हणून होती. रेशीम विकास विभागाने या गावातील जवळपास ४० ...
टो या गावाची ओळख काही वर्षांपूर्वी रेशीम कोश उत्पादकांचे गाव म्हणून होती. रेशीम विकास विभागाने या गावातील जवळपास ४० शेतकऱ्यांना मखमली क्रांतीचा मार्ग दाखविला. तुती लागवड, रेशीम किडे संगोपन, रेशीम कोश उत्पादनासाठी टिनाचे शेड देखील बांधून दिले ते शासकीय अनुदानातून. वर्षाकाठी या व्यवसायातून प्रत्येक शेतकऱ्यास दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला; मात्र काही कारणाने रेशीम कोश उत्पादनापासून शेतकरी माघारी फिरले.
आता नव्याने केशव काकडे या युवा शेतकऱ्याने २० बाय ५० फूट आकाराचे कायमस्वरूपी शेड उभारून कुक्कुटपालन व्यवसायाला चालना दिली आहे. त्यांनी नाशिक येथून कुक्कुटपालनाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासोबतच सखाराम काकडे, आश्रू काकडे, संतोष काकडे, शेख रउफ, गणेश इंगळे, मारुती काकडे, श्यामा काकडे व रवी काकडे या युवा शेतकऱ्यांनीही टिनाच्या शेडमध्ये देशी कुक्कुट संगोपनाला सुरुवात केली. या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली.
....................
शेतमालाचे उत्पादन घेण्यावरही भर
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या केशवकडे सात एकर शेती असून त्यापैकी तीन एकर ओलिताखाली आहे. गहू व हरभरा ही पिके त्यात घेतली जातात. सखारामचे शिक्षण पदवीपर्यंत झाले. त्याच्या संयुक्त कुटुंबात २० एकर शेती आहे. त्यातील अर्धी शेती सिंचनाखाली असून गहू, हरभरा व थोडा भाजीपाला घेण्यात येतो. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आश्रू काकडेची ६ एकर शेती असून थोडीफार ओलिताची व्यवस्था आहे. त्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते.