पूर्वसूचना न देता तोडला जातोय कृषिपंपांचा वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:53 AM2021-03-13T11:53:43+5:302021-03-13T11:53:58+5:30
MSEDCL News महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेत ११ मार्चअखेर १० हजार ४६२ कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : वीज तोडणीला देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी जाहीर केले. त्यानंतर गुरुवारपासूनच महावितरणने धडक कारवाईची मोहीम हाती घेत ११ मार्चअखेर १० हजार ४६२ कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या धोरणाप्रती शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र नऊच दिवसांनंतर १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून विद्युत देयक वसुलीचे फर्मान सोडले.
यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकला असून, वाशिम मंडळाकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात १२ हजार १५६, रिसोड तालुक्यातील ११ हजार ५८६, मंगरूळपीर ९ हजार २०६, कारंजा ११ हजार ३७२, मानोरा ७ हजार ३१८ आणि मालेगाव तालुक्यात १० हजार ५८, अशा एकूण ६१ हजार ६९६ कृषिपंपधारक ग्राहकांना ६ हजार ८६१ कृषिपंप रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ११ मार्चअखेर थकबाकीदार असलेल्या १० हजार ४६२ कृषिपंपधारक ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून कापण्यात आला. त्यापैकी ६० ग्राहकांनी चार लाख रुपये रकमेचा भरणा केला असून, उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी महावितरणच्या पथकाने कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत असून, आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीप्रत शेतकरी पोहोचले आहेत.
महावितरणकडून अचानक सुरू झालेला विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईने शेतकरी धास्तावले आहेत. भाजीपाला व फळपिकांचे यामुळे अतोनात नुकसान होणार आहे. याप्रकरणी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.
- विष्णूपंत भुतेकर,
संस्थापक, भुमिपुत्र शेतकरी संघटना