२४ दिवसांत ४०० जणांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:17 AM2021-06-26T11:17:56+5:302021-06-26T11:18:14+5:30
MSEDCL News : ४०० पेक्षा अधिक नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाचे संकट निवळत नाही तोच महावितरणने वीज देयक वसूलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामाध्यमातून १ ते २४ जून या कालावधीत वीज देयक थकीत असलेल्या आणि ते अदा करण्यास टाळाटाळ करित असलेल्या ४०० पेक्षा अधिक नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जिल्हाभरात सक्रीय असलेल्या वसूली पथकांकडून कोणाचीही गय केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसूलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्यीक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे ३१ मे अखेर ७५.७९ कोटी रुपये थकीत होते. १ जूनपासून संसर्गाचे संकट ओसरू लागताच महावितरणनेही वीज देयक वसूलीची धडक मोहीम हाती घेतली आहे.
यामाध्यमातून गेल्या २४ दिवसांत २ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली असून देयक अदा करण्यास टाळाटाळ करित असलेल्या १६५ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात; तर २३९ ग्राहकांना वीज पुरवठा कायमस्वरूपी तोडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)