विद्यूत पुरवठा खंडित; शिरपूर येथील पाणी पुरवठा सातव्या दिवशीही ठप्पच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 03:27 PM2020-02-10T15:27:50+5:302020-02-10T15:33:11+5:30
३१ लाखांचे देयक ग्रामपंचायतीकडे थकीत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा अडोळ प्रकल्पावरील विद्यूत पुरवठा थकीत देयकापोटी महावितरणने सोमवार, ३ फेब्रूवारी रोजी खंडित केला. तेव्हापासून आजपर्यंत (९ फेब्रूवारी) देयक अदा न केल्याने सातव्या दिवशीही गावचा पाणीपुरवठा ठप्पच होता. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत असून नियमित कर अदा करणाऱ्यांचीही यामुळे गैरसोय होत असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
१७ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शिरपूर जैन या गावातील नागरिकांना अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पावर एक्सप्रेस फिडर कार्यान्वित असून त्याचे ३१ लाखांचे देयक ग्रामपंचायतीकडे थकीत आहे. दुसरीकडे गावातील लोकांकडे सुमारे ८० लाखांचा कर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीला विज पुरवठ्याचे देयक अदा करणे अशक्य झाले आहे. परिणामी, पुरेसा वेळ देऊनही देयक अदा न केल्याने महावितरणने ३ फेब्रूवारी रोजी एक्सप्रेस फिडरचा विद्यूत पुरवठा खंडित केला. तेव्हापासून आजपर्यंत ७ दिवसाचा कालावधी होऊनही हा तिढा न सुटल्याने पाणीपुरवठा अद्याप ठप्पच असून शिरपूरकरांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे. गावातील काही लोकांनी त्यावर पर्याय म्हणून स्वत:च्या कुपनलिका खुल्या करून दिल्या आहेत. त्यावरून नागरिक पाण्याची गरज भागवत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, गावकऱ्यांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर अदा करावा आणि ग्रामपंचायतीनेही महावितरणचे थकीत देयक अदा करून पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून जोर धरत आहे.
पाणी पट्टी वसूलीतूनच वीज पुरवठ्याचे देयक अदा करावे लागते. त्याशिवाय इतर कुठलीही तरतूद नसल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याकडे असलेला कर विनाविलंब अदा करायला हवा. कर्मचाºयांकडून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; मात्र विशेष फायदा झाला नाही. त्यामुळेच हा प्रश्न उद्भवला आहे.
- बी.पी. भुरकाडे
ग्रामविकास अधिकारी, शिरपूर जैन