वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:55 PM2019-12-20T14:55:42+5:302019-12-20T14:55:47+5:30
रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात व सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचन क्षेत्र प्रभावित होत आहे. जादा वीज भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे शेतकरी वैतागले आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा रब्बी हंगामावर खिळल्या आहेत. रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अनसिंग सर्कलमधील अनेक शेतकºयांना कोटेशनचा भरणा करूनही कृषीपंप जोडणी मिळाली नाही तसेच काही शेतकºयांनी मागणी करूनही नवीन विद्युत रोहीत्र मिळाले नाही. रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कळंबेश्वरचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याकडे केली होती. यावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातही जादा भारनियमन, तांत्रिक बिघाड आदींमुळे सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे प्रकल्प, नदी, बॅरेज, विहिरी, शेततळ्यात पाणी असूनही सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तीन मध्यम आणि १३३ लघू प्रकल्प व बंधारे मिळून १३६ प्रकल्प आहेत. यामधून सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याशिवास विहिरी, शेततळे याच्या माध्यमातून सिंचन करता येते. परंतू, अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचन प्रभावित होत आहे. (प्रतिनिधी)