शिरपूरात ‘जनरेटर’व्दारे वीज घेवून ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा होणार पुर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:33 PM2019-02-19T15:33:30+5:302019-02-19T15:33:34+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : ‘बीएसएनएल’वर वीज कपातीची नामुष्की!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून विस्कळित झालेली सेवा सुरळित केली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय चैताने यांनी दिली
शिरपूर जैन (वाशिम) : ‘बीएसएनएल’वर वीज कपातीची नामुष्की!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून विस्कळित झालेली सेवा सुरळित केली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय चैताने यांनी दिली असून महत्वाच्या कार्यालयांचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.
शिरपूर येथील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाकडे वीज वितरण कंपनीचे गेल्या चार महिन्यांपासूनचे ६९ हजारांचे वीज देयक थकीत आहे. ते अदा न केल्याने अखेर १८ फेब्रूवारीला महावितरणने ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे गावातील बँक आॅफ महाराष्ट्र, जनता कमर्शियल बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रासह अन्य ठिकाणची ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवाही ठप्प झाल्याने नागरिकांसह अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाले. यासंबंधी ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित केले. त्याची तडकाफडकी दखल घेण्यात आली असून विद्यूत देयक भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसली तरी ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून किमान शिरपूर येथील सर्व बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रातील इंटरनेट सुविधा सुरळित करून दिली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय संजय चैताने यांनी दिली.
‘बीएसएनएल’च्या कार्यालयांना माहेवारी मिळणारे वीज देयक अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने देयक अदा करणे कठीण होत आहे. याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला असून तुर्तास ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देत शिरपूरकरांचा प्रश्न सोडविला जाणार आहे.
- संजय चैताने, जिल्हा प्रबंधक, बीएसएनएल, वाशिम