शेतकऱ्यांसाठी कारंजा तहसील कार्यालयासमोर 'प्रहार'चे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:06+5:302021-03-29T04:23:06+5:30
कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव (गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद (धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक ...
कारंजा तालुक्यातील कामठवाडा, आखतवाडा, जांब, पिंपळगाव (गुंजाटे), बोरव्हा, दादगाव, ममदाबाद (धोनी), गंगापूर व उंबर्डा बाजार येथील शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत पीक नुकसानीबाबत ई-मेल व कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाद्वारे तक्रार देऊनही नुकसानभरपाई मिळाली नाही. सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून दिली व त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी १९ जानेवारीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अर्जुन सोडा यांच्या समवेत कृषी कार्यालयात सदर प्रकरणासंबंधी माहिती घेतली असता कंपनीच्या प्रतिनिधीने कंपनीकडून खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसानीचे प्राप्त झालेले अर्ज व झालेल्या पिकाचे पंचनामे व नुकसानभरपाई पात्र व भरपाई अदा केल्याचे एकूण सर्व शेतकऱ्यांची यादी त्यांना प्राप्त झाल्याची माहिती मेलद्वारे दाखविली. सदर यादी तपासली असता वरील गावातील शेतकऱ्यांनी ई-मेल व टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही उपरोक्त गावे सूचनापत्र यादीत समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले. सर्व पुरावेही आम्ही निवेदनासोबत संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते व त्यावरून स्पष्टपणे निदर्शनास येते की कंपनीला पीक नुकसान झाल्याबाबत तक्रार करूनही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले आहे.
२ महिन्यांचा कालावधी जाऊनही शासन-प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत उपरोक्त गावातील शेतकरी बांधवांना पीक नुकसान मिळत नाही तेव्हापर्यंत उपाेषण सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.