आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:00+5:302021-06-18T04:29:00+5:30
शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव सोहळा १३ ...
शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव सोहळा १३ जून रोजी केकतउमरा येथील चेतन सेवांकुर दिव्यांग निवासस्थानी थाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विजय साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुजाता भगत, माजी सैनिक रामभाऊ ठेंगडे, आरोग्य सहायक नितीन व्यवहारे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, प्रा. राम धनगर उपस्थित होते.
गतवर्षीपासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर या आजाराला रोखण्यासाठी आरोग्य विभागाला सतत क्रियाशील रहावे लागले. यामध्ये वाशिम शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्यसेवक, तसेच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी आपले कसब पणाला लावून योग्य सेवा दिली. त्यांनी दिलेल्या प्रामाणिक सेवेचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे या हेतूने या केंद्राच्या प्रमुख असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता भगत, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सहायक नितीन व्यवहारे यांनी पुढाकार घेऊन हा कृतज्ञता सोहळा घडवून आणला. यावेळी तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आरोग्यसेविका अश्विनी सरकटे, पार्वती वाघमारे, सीमा गायकवाड, कल्पना लबडे, पूजा राऊत, दुर्गा मेश्राम, शिल्पा अवताडे, शांता राठोड, स्वाती कांबळे, जया ढेंगे आदींना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, तसेच आशा स्वयंसेविका सुनीता राठोड यांना सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम क्रमांकाने, रेखा धोंडफळे यांना द्वितीय क्रमांकाने, तर वैजयंती आघम यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. यावेळी अर्चना लांडगे, वर्षा भगत, नंदा वानखेडे, अनिता गवई, शीतल जगताप, नंदा इंगोले, सविता भगत, सोनू धुळधुळे, आरती कांबळे, शोभा गाभणे, सुरेखा काष्टे, रंजना दलवे, हिरा जाधव, संगीता काळबांडे, सुजाता इंगोले, लक्ष्मी सावळे, रेखा सावळे, सुनीता भालेराव, छाया जाधव आदींना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आशा गटप्रवर्तक लंका शेंडे, औषध निर्माण अधिकारी महेंद्र साबळे यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार साळवे यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते गजानन धामणे यांनी, तर आभार प्रदर्शन नितीन व्यवहारे यांनी केले.