वाशिम येथे मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:34 PM2018-06-03T14:34:54+5:302018-06-03T14:34:54+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे २ जूनपासून सदर मोफत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला.
वाशिम - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे २ जूनपासून सदर मोफत प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला.
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम लिपिकवर्गीय पदांच्या तयारीसाठी वाशिम येथे मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाणार असून, नवव्या तुकडीचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक रमेश एन. कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान उपस्थित होते. यावेळी कटके म्हणाले की, युवकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांची दालन खुले आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांनी योग्य मार्गदर्शनात अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत दिल्या जाणारे प्रशिक्षण महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात मिळण्यासाठी संस्थेने परिश्रम घेतले असून, यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकुमार पडघान यांनी जिल्हा स्पर्धा परीक्षेत तयारी व वेळेचे नियोजनाबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल पी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाधिकारी संजय इंगोले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात यावे व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण व अन्य उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक प्रविण खाडे यांनी तर संचालन अमोल पाईकराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसेनजीत धडे, दीपक कांबळे, निलेश इंगोले यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणार्थींना ३ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि २ हजार रुपये किंमतीचा पुस्तक संच देण्यात येणार आहे.