वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा
By संतोष वानखडे | Published: June 4, 2023 04:11 PM2023-06-04T16:11:17+5:302023-06-04T16:11:34+5:30
गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
वाशिम : मान्सून पूर्व पाऊस अखेर रविवारी (दि.४) जिल्ह्यात दाखल झाल्याने उन्हाचा तडाखा झेलणाऱ्या वाशिमकरांना दिलासा मिळाला.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. रविवारी (दि.४) सकाळी ११:३० वाजतानंतर तयार झालेल्या ढगांच्या प्रभावामुळे १२ वाजेपर्यंत वातावरण हलके ढगाळ होते. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझीम पाऊस पडला. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्यानुसार, विदर्भात आता पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
रिसोड येथे झाड कोसळले; वाहतूक जाम
रिसोड शहरासह ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. रिसोड शहरात वाशिम नाक्याजवळ दुकानासमोरील वृक्ष कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, झाड रस्त्यावर कोसळल्याने काही वेळेसाठी वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती.