गणेशोत्सव : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:46 AM2020-08-19T11:46:47+5:302020-08-19T11:47:26+5:30
प्लास्टर आॅफ पॅरिस हाणीकारक असले तरी दिसण्यास आकर्षक असल्याने यावर्षीही शाडूऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती असल्याचे दिसून येते.
वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतिक असणाऱ्या गणरायांचे आगमन २२ आॅगस्ट रोजी होणार असून, यावर्षी कोरोनामुळे घरगुती पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पर्यावरणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिस हाणीकारक असले तरी दिसण्यास आकर्षक असल्याने यावर्षीही शाडूऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती असल्याचे दिसून येते.
दरवर्षी गणरायांचे आगमन हा सोहळा जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. २२ आॅगस्टला गणरायांचे आगमन होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून, घरगुती पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. जिल्ह्यात ६० ते ७० मूर्तीकार असून, गणरायांच्या मूर्ती बनविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिस हे पर्यावरणास हाणीकारक असल्याने त्याऐवजी शाडूच्या मूर्तीला पसंती द्यावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. परंतू, शाडूच्या मूर्ती पण दिसण्यास आकर्षक नसल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच अधिक पसंती असते. यावर्षीदेखील प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीला सर्वाधिक पसंती असल्याचे मूर्तिकार सांगतात.