गर्भवती महिलांनो, आता गावातच करा मोफत तपासणी! दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्रीरोग तज्ज्ञ येणार
By संतोष वानखडे | Published: March 14, 2024 12:58 PM2024-03-14T12:58:06+5:302024-03-14T12:59:04+5:30
दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.
वाशिम : ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना नजीकच्या सरकारी आरोग्य संस्थेत मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दर महिन्याच्या ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.
ग्रामीण भागात गर्भवती महिलांना गरोदरपणात आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी, याबाबत फारशी माहिती नसते. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गर्भवती महिलांना दर महिन्याला स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी व औषधोपचार मिळण्यातही अनेक अडथळे येतात. गर्भवती महिलांना दर महिन्याला आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत दर महिन्याच्या ९ तारखेला स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार यापुढे दर महिन्याच्या ९ तारखेला सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत गर्भवती महिलांची तपासणी केली जाणार आहे. गावात किंवा गावानजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रांत स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत तपासणी होणार असल्याने गर्भवती महिलांची आरोग्यविषयक गैरसोय टळेल, असा विश्वास आरोग्य विभाग बाळगून आहे.
कोणत्या तपासण्या मोफत होणार?
दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदरपणात आवश्यक असणाऱ्या सर्व रक्ताच्या तपासण्या, लघवी तपासण्या व इतर तपासण्यादेखील केल्या जाणार आहेत. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी एक सोनोग्राफीदेखील मोफत करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याच्या नऊ तारखेला जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांत स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. गर्भवती महिलांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्रीरोग तज्ञांमार्फत तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सुहास कोरे
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम