कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची तयारी; जिल्हा परिषदेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:19 PM2018-09-18T14:19:56+5:302018-09-18T14:20:24+5:30
वाशिम: जिल्ह्यात येत्या २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात येत्या २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुख व समन्वय समितीची बैठक पार पडली.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात पार पडलेल्या या बैठकीत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. दिपक सेलोकार यांनी कुष्ठरुग्ण शोध अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ११२२ पथकांद्वारे १० लाख ९१ हजार ७२४ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे हे अभियान प्रामुख्याने झोपडपट्टीसह इतर निवडक भागांत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक (पुरुष, महिला), आरोग्य सेवक (पुरुष, महिला), आशासेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांचा सहभाग राहणार आहे. कुष्ठरोगाची लागण झालेले; परंतु उपचाराखाली नसलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणत विना विकृत बरे करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची कुष्ठरोग व त्वचारोग तपासणी करण्यासाठी तपासणी करणाºया पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी केले आहे.